औरंगाबाद : महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्या कडून छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती तिथीनुसार साजरी करणार असल्याचे सांगण्यात आले होते. त्यानुसार गुरुवारी 12 मार्चला शिवजयंती साजरी करण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे बुधवारीच औरंगाबादेत दाखल झाले आहे .आज क्रांती चौकात शिवपुजन सोहळा पार पडणार आहे. सकाळी 10:15 नंतर राज ठाकरे क्रांतीचौक या नियोजन स्थळी शिवपुजन करणार आहेत. रामा हॉटेलमधून राज ठाकरेंना क्रांतीचौकात आणण्यासाठी शेकडो मनसे कार्यकर्ते हॉटेलच्या बाहेर जमले आहेत. हे कार्यकर्ते राज ठाकरेंना शिवपुजन कार्यक्रमास नेतील. तर सायंकाळी 4 वाजता मिरवणूक निघणार आहे. ती अमित राज ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत निघणार आहे.
देशात आता कोरोना व्हायरस झपाट्याने वाढत आहे. खबरदारीचा उपाय म्हणून मनसेच्या कार्यक्रमाला परवानगी नाकारण्यात आली आहे. तरीही मनसेकडून औरंगाबादमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती तिथीनुसार साजरी केली जाणार आहे.
'करोनाची बाधा होऊ नये म्हणून काळजी घेणं गरजेचं आहेच, पण महाराष्ट्रात 'करोना'च्या फारशा काही केसेस नाहीत. कुणीही दगावलेलं नाही. असं असताना प्रशासनाकडून अनेक गोष्टींवर बंदी घातली जातेय. परवानगी नाकारली जातेय. कशासाठी लोकांना विनाकारण घाबरवत आहात?,' असा खडा सवाल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला आहे. मनसे शिवजयंती साजरी करणारच, असंही त्यांनी प्रशासनाला ठणकावलं आहे.